शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

व्यक्तीपूजा की तत्त्वपूजा?

स्वामी विवेकानंदांचे चेन्नईतील व्याख्यान वाचनात आले आणि, प्रसार माध्यमांमध्ये गाजलेला द्वारका पीठाचे शंकराचार्य आणि साईबाबा यांच्यातील वादाचा मुद्दा आघात करू लागला… व्यक्तीपूजा की तत्वपूजा?
हिंदू धर्माचा पाया कोणा एका मनुष्याचे विचार नसून, शतकानुशतके चालत आलेल्या संस्कृतीने निर्माण केलेली तत्व आहेत. तिचा मूळ स्त्रोत अजून कोणीही शोधू शकलेले नाही… त्यांना सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याची माध्यमे म्हणजे संत मंडळी. द्वैत, अद्वैत, शैव, वैष्णव हे देव जाणण्याचे अथवा देवा पर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग आहेत. आपल्याला त्यांच्यात जे वाद दिसून येतात, ते स्वतःचा मार्ग अचूक व्हावा यासाठी आवश्यक असलेले असावेत. कारण निंदा ऐकल्या शिवाय स्वतःत सुधारणा करता येऊ शकत नाही. बरे, ते वाद काश्यासाठीही असोत पण, हिंदू धर्म सर्व समावेशक आहे. त्यामुळे त्यांच्यातील तात्विक वादांना जडत्वाचे स्वरूप देऊन आपापसात फुट पाडणे कितपत योग्य आहे? पाश्चात्य ज्ञान संपूर्ण वाईट आहे अश्यातला भाग नाही पण, भारतीयांनी घेतलेल्या पाश्चात्य ज्ञानात त्यातील चांगल्या बरोबर आलेला धोकादायक गुण कुठला असेल तर तो म्हणजे जडवादाचे प्राबल्य…
स्वामीजींनी पूर्वी हा धोका फक्त खुणावला होता. पण, आता तो प्रत्यक्षात उतरलेला दिसत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यक्तिपूजा. मग ती शिव जयन्तीला शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नारळ फोडून, स्वातंत्र्यवीर सावरकर रचित आरती म्हणून केलेली का असे ना… सावरकरांना आरती रचल्याचा आणि महाराजांना स्वराज्य स्थापण्यासाठी केलेल्या अट्टहासाचा कोण पश्चाताप होत असेल ना! महाराजांनी काहीतरी काम केले म्हणून महराज झाले देवपुरुष. त्यांची तत्वे, पूजणार्याने स्वतःत किती बाणवली? ते कोणी विचारील तर खबरदार! या जडवादी वृत्तीने काही संभवत असेल तर तो फक्त हिंदू धर्माचा ऱ्हासच होय! कारण विवेकीबुद्धीने ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा आणि बाकीची ती अंधश्रद्धा!
मी शंकराचार्य किंवा साईबाबा यांपैकी कोणाचाही समर्थक नाही, विरोधकही नाही. कारण नसत्या टोप्या नि कापडे डोक्यावर मिरवायला मला आवडत नाहीत. मूर्तीपूजा आणि श्रद्धा यांचे पूर्वापार नाते आहे. मध्यंतरी भारतीय मूर्तीविज्ञान (Indian Iconography) या विषयावर व्याख्यान व चर्चा सत्र आमच्या अभ्यासासाठी आयोजित केले होते. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात अंकुरलेल्या भूमीचे स्त्रीमूर्तीत रूपीकरण झाल्याचे आढळते. आणि तेच मूर्ती पूजेचे प्राथमिक स्वरूप मानले गेले आहे. मुर्तीपूजा व हिंदू-बौद्ध श्रद्धा यावरदेखील चर्चा झाली. विष्णूचे नववे अवतार भगवान बुद्ध असल्याची श्रद्धा समाजात रूढ असल्याचे ११ ते १५ व्या शतकांतील अवशेशांतून समजते.  मध्यंतरी 'कास्ट अवे' नावाचा एक हॉलीवूड चित्रपट बघितला, त्यात देखील एका बेटावर, एकटा पडलेला मनुष्य एका फुटबॉलला आपले सर्वस्व मानतो. यावरून असे स्पष्ट होऊ शकते की अधिक काळासाठी रूपहीन शक्तीची साधना करणे सामान्य माणसाला शक्य होत नाही आणि तो साधनेसाठी मूर्त स्वरूप शोधू लगतो. या मूर्त स्वरूपात, साधना एका शक्तीची असते हे विसरून चालणार नाही. आजचा भारतीय समाज जडवादाने अश्याप्रकारे वेढला गेला आहे की, चित्रपट बघितलेला एखादा अविवेकी हिंदू फूटबॉल ची पूजा करून त्याचे मंदीर बांधायला कमी करणार नाही. हास्यास्पद असली तरी ही वस्तू स्थिती आहे. कारण आज आपल्याला गणपतीच्या मूर्तीच्या पाटपूजेचा सोहळा बघण्यात धन्यता वाटते. उत्तरपूजा केलेल्या मूर्त्यांच्या आरत्यांसाठी आणि त्या नंतरच्या प्रसादासाठी रांगा लागतात. कुठला हिंदू धर्मग्रंथ असल्या जडवादी प्रथांना तारील ईश्वर जाणो.
मगाशी म्हटल्या प्रमाणे अविवेकी बुद्धीने कुठलीही गोष्ट आचरणे हिंदुत्वाला धरून नाही. आणि ती आचारली जात असता त्याचे तत्काळ खंडन करणे हे धर्मपीठांचे, धर्मगुरूंचे काम आहे. चुकीच्या रुढींबाबत द्वारका पीठाचे शंकराचार्य यांना अचानक आलेली जाग स्वागतार्ह असली तरी निंदात्मक आहे. कारण मार्ग चुकलेल्यांना लगेच बरोबर मार्ग सांगितला असता ते मागे फिरून त्या मार्गाला लागतात… पण नव्याने मार्ग निर्माण केलेला असेल, भलेही तो चुकीच्या दिशेने का होईना त्यांना सरळ मार्गावर येण्यासाठी त्यांच्या नकळत पुढचा मार्ग वळवून घ्यायचा असतो. निर्मिलेला मार्ग खोदून काढणे हा त्यावरचा उपाय नाही. आज साई बाबांवरील श्रद्धा-अंधश्रद्धा जगभर पसरली आहे. तीवर टीका करून काही साध्य होणार असेल तर आंतर्धार्मिक आणि अंतर्धार्मिक अस्थिरताच आणि पर्यायाने हिंदू धर्माचे दुर्बलीकरण. हाच विषय जर आध्यात्मिक ज्ञानदृष्टी देऊन हाताळला असता तर प्रसार माध्यमांना नाहक विषय मिळाला नसता… देशाटन करून देशस्थितीचा अभ्यास करावा असे स्वामीजी नेहमी सांगत, पण द्वारका पीठाचे शंकराचार्यांनी तसे न केल्याने ही निंदा सहन करावी लागत आहे. साईबाबा संत होते. पण त्यांची तत्वे सोडून फक्त व्यक्ती पूजाच जेव्हा लोकांत रूढ होत होती तेव्हाच त्यांनी इशारा दिला असता तर कोण भावना दुखावाल्या गेल्या अस्त्या ना! आज शिर्डीला विशेष विमानतळ बांधण्याचे मंजूर होईपर्यंत जडवादाने धर्म पोखरला जाईपर्यंत द्वारका पीठाचे शंकराचार्य कुठे वेद पठन करीत होते?
जे दोन लाख नागा साधू मंदिरे फोडायच्या धमक्या देता आहेत त्यांनी इतके वर्ष समाज प्रबोधन करीत जडवाद निवारण्याचे काम केले असते तर आज हि वेळ आली असती का?
हा विषय एवढ्यातच सोडून देता उपयोगाचा नाही. आपण धर्माच्या नावाखाली करत असलेले आचरण खरंच धर्माला धरून आहे ना? कुठलेही आचरण आपण अविवेकी बुद्धीने, कोणाच्या सांगण्यावर मंदपणे विश्वास ठेवत, तर करत नाही आहोत ना? हे प्रश्न सातत्याने स्वतःला विचारले गेले पाहिजेत. माहित नसलेली उत्तरे योग्य व्यक्तीकडून, authentic पुस्तकातून, शक्य झाल्यास प्रत्यक्ष दर्शन ग्रंथ अगर धर्म-अर्थ शास्त्रातून शोधली पाहिजेत. स्वामीजी संस्कृती जपण्या करता संस्कृत शिकण्यावर भर देत. विवेकीबुद्धीने केलाल्या धर्माचरणातच आपल्या देशाचे, आपल्या धर्माचे, आणि पर्यायाने स्वतःचे हित सामावलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा